कोल्हापूर।१ जानेवारी। कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असूनअध्यक्षपदी गगनबावडा तालुक्यातील कॉंग्रेसचे सदस्य बजरंग पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश पाटील यांची यांची निवड निश्चित मानली जात आहे. भाजप आघाडीकडे असलेल्या शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्षांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळल्याने महाविकासआघाडीकडे सध्या ३४ पेक्षा अधिक सदस्य झाल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागणार हे निश्चित झाले आहे.
नव्याने मंत्री झालेले जिल्ह्यातले नेते ना. हसन मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांनी (बुधवार) बेळगाव येथे सर्व महाविकास आघाडीकडे असलेल्या जि. प. सदस्यांची सायंकाळी बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी आ. सत्यजीत पाटील, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, के. पी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभुशेटे आदी नेतेही उपस्थित होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे अपक्षासह एकुण २६ सदस्य आहेत. मात्र पी.एन.पाटील गटाची भुमिका निश्चित नसल्याने त्यांच्या गटाचे चार सदस्य वगळल्यास आघाडीकडे २२ सदस्यांचे संख्याबळ आहे. पी. एन. पाटील यांची नाराजी दूर झाल्यास हा आकडा २६ राहण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे ९, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २, आ. आबिटकर गटाचे २ अशी ३९ संख्या महाविकास आघाडीच्या पारड्यात आहे. पी.एन गटाचे सदस्य सोडून ही संख्या ३५ राहणार आहे. बहुमतासाठी ३४ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार हे निश्चित झाले आहे.
दरम्यान पी.एन.पाटील यांच्या नाराजीची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेतली गेली असून त्यांची नाराजी दुर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रयत्न केल्याने पी.एन.पाटील यांनी एक पाऊल माघारी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर राज्यमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यांची समजूत काढली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप बरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने त्यांचा पाठींबा महाविकास आघाडीलाच राहणार आहे. सत्तावाटपात अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. तर शिवसेनेला ३ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ सभापतीपद अशी पदांची वाटणी होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहामध्ये सुरु होणार आहे.