Categories: राजकीय

कोल्हापूर ZP – अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत कोण मारणार बाजी? वाचा सविस्तर

कोल्हापूर।१ जानेवारी। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आज (बुधवार) रात्री अनेक घडामोडी घडणार असून त्याचा परिणाम उद्याच्या जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या रूपाने पहायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

महाविकास आघाडीचा फॉर्मुला राबवून जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून केला जात आहे. तर भाजप कडून सत्ता संपादन करण्यासाठी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे, मंत्रीपद न मिळाल्याने कॉंग्रेसचे नाराज आमदार पी.एन.पाटील व स्वाभिमानीचे राजू शेट्टी तसेच जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला शिवसेनेचे पराभूत आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर यांचीही साथ मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोण कुणासोबत हातमिळवणी करणार आणि जिल्हा परिषदेमध्ये बाजी मारणार हे ठरणार आहे. 

आमदार पी.एन. पाटील आणि स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या भुमिकेकडे लक्ष

राज्य मंत्रीमंडळ विस्तारात डावलल्याने करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी.एन.पाटील नाराज आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पी.एन.पाटील यांच्यावर कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढवलाय. त्यामुळे नाराज पी.एन.पाटील कोणती भुमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. त्याचबरोबर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांना ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळाल्याने तेही नाराज आहेत. मंत्रीपद सोडाच शपथविधीसाठी देखील बोलावले नाही अशी खंत शेट्टी यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीचे पडसाद ही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर पडणार आहेत. या दोन्ही नाराज नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपकडून फिल्डींग लावण्यात आल्याची माहिती आहे. 

शिवसेनेच्या नेत्यांची भुमिका ठरणार निर्णायक

शिवसेनेचे पराभूत आमदार चंद्रदीप नरके यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात असला तरी चंद्रदीप नरके यांनी कॉंग्रेससोबत जाण्यास विरोध केल्याचे समजत आहे. दरम्यान शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी मात्र शिवसेनेचे सदस्य कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीसोबत राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 

दरम्यान महाविकास आघाडीची मोट बांधली गेल्यास सर्वाधिक सदस्य असलेल्या कॉंग्रेसकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद राहणार आहे. कॉंग्रेसकडून गगनबावड्याचे बजरंग पाटील यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर असून ते राज्यमंत्री सतेज पाटील गटाचे आहेत. त्याचबरोबर ते करवीर विधानसभा मतदार संघातील असल्याने आमदार पी.एन.पाटील यांच्याकडूनही त्यांच्या नावाला पसंती राहण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. भाजपकडून अरूण इंगवले यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे. उपाध्यक्ष पदाचा विचार करता राष्ट्रवादीचे सतीश पाटील आणि ताराराणी आघाडीचे राहुल आवाडे यांच्यात सामना रंगणार आहे. 

अध्यक्ष पदाचे दावेदार
  • कॉंग्रेस – प्रकाश भांदिगरे, बजरंग पाटील, शिल्पा खोत
  • भाजप – अरूण इंगवले
उपाध्यक्ष पदाचे दावेदार
  • राष्ट्रवादी – सतीश पाटील, जयवंतराव शिंपी
  • ताराराणी आघाडी – राहूल आवाडे
Team Lokshahi News