Categories: Featured

कोल्हापुरी भाषा म्हंजे ‘खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी’; मराठी भाषा दिनानिमित्त वाचा रांगड्या कोल्हापूरी भाषेची झणझणीत मिसळ!

आम्हाला ते आले होते, गेले होते अस लय लांबडं बोलाय अजिबात आवडत न्हाई बगा. आवडण्यापेक्षा ते जमतच न्हाई ओ. उगीच साळसूदपणाचा आव आणून शुद्ध मराठी भाषा बोलायला गेलो तर आम्हाला आमचीच लाज वाटंल बघा. आमची भाषा रांगडी हाय. कोल्हापूरच्या मातीतल्या कुस्तीच्या डावासारखी भारी हाय. तांबड्या पांढऱ्या सारखी चरचरीत तर गुळासारखी गुळमाट हाय. आमची भाषाच अशीच हाय. आज मराठी राज्यभाषा दिन हाय. मग चला आज जाणून घेऊया माझ्या कोल्हापुरी भाषेबद्दल…

आमच्या शाळेतली पोरं एकामेकांना बापाच्या नावनं हाक मारतात. शाळेतच नाही तर जेवणं उरकल्यावर कट्यावर जमणारी मंडळी ही एकमेकांच्या बापाचा उद्धार करत बोलतात. आणि हे सगळं अगदी खुशीत चाललेलं असत. हे स्वतच्या पोरांची लग्न झाली तरीही म्हातारे मजेत एकमेकांना शिव्या देत रंकाळ्यावर फिरत असतात. आमच्या भाषेत काहीही बोलायच्या आधी ‘ते नव्हं’ म्हणत सुरुवात करणं, हे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागलं. आमच्या भाषेवर, भाषेच्या गोडव्यावर कोल्हापुरी माणूस गुळा एवढचं प्रेम करतो.

कोल्हापुरी भाषेत येणारा शिवराळपणा गोड वाटतो. रागात भांडणातही त्याच शिव्या दिल्या जातात. सुक्काळीच्या हा शब्द कन्नड भाषेतून तर राण्डच्या ही अस्सल कोल्हापुरी बोली कोंकणी मराठी मधून आलीय. आजही कोल्हापुरात रस्त्यावरून चालतांना कुणी लंगोटीयार भेंटला, की ‘काय राण्डंच्या, हिकडं कुनीकडं निगालंय्‌स? ‘ अशी हाक जागोजागी ऐकू येते. कोल्हापुरातील स्त्रियांची भाषा. व्याकरण व्यवस्थेत लिंग वचनाबद्दलचा मोठा फरक स्त्रियांच्या भाषेत आहे. ‘येतो’, ‘जातो’, ‘करतो’, ‘आलतो’, गेलतो असे शब्द आमच्या पोरी सर्रास बोलतात. ‘काय मर्दिनी’ हे केवळ इथल्याच महिलांच्या तोंडी ऐकायला मिळतं. ‘बलिवलंय’, कवा आलईस, ‘येतायसा’, ‘जातायसा’, ‘गेलासा’ असे शब्द केवळ इथल्या भाषेतच ऐकायला मिळणार बघा.

कोल्हापुरची रांगडी कट्ट्यावरची भाषाही आता प्रचलित झालीय. ‘काय भावा’, ‘नाद नाही करायचा,’ ‘काटाकीर्रर्र’, ‘खटक्यावं बोट, जाग्यावं पल्टी’ अशी अनेक बेधडक उच्चारणरूपे अवतीभवती भेटत राहतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या आमदारांनी ‘आमचं ठरलंय’ हा शब्दही उदयास आणला. १९८० नंतर मात्र राजन गवस, आनंद पाटील, कृष्णात खोत, किरण गुरव, अशोक पाटील, रफीक सूरज यांनी लेखणीतून तर अप्पासाहेब खोत यांनी कथाकथनातून तळागळातील कोल्हापुरी बोली महाराष्ट्रभर पोहोचवली. पिंजरा, केला इशारा जाता जाता, पाटलाची सून, सांगत्ये ऐका, पांडू हवालदार, सोंगाड्या अशा सारख्या ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटांमध्ये कोल्हापुरी बोलीतील संवाद आले आहेत.

अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये कोल्हापुरी बोलीतील संवाद आले आहेत. तर सध्या मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या तुझ्यात जीव रंगला, राजा राणीची ग जोडी यातही कोल्हापुरी भाषेचा टच दिसतोच. इतकच काय तर रेडिओवरही आरजे कोल्हापुरी भाषेची भुरळ घालतात. त्यापैकी आर जे सुमीत हा कोल्हापुरी तरुण सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी पदार्थासाठी खुळा रस्सा, तांबडा-पांढरा, रक्ती मुंडी, कुंभारी रक्ती, नळी चॉप्स अशी नावं तोंडी येतात आणि तोंडाला अक्षरशः पाणी सुटत राव. कोल्हापूरच्या जुन्या भागात दुधाची मिसळ तर राधानगरी परिसरात दुधाची आमटी करतात! आमची कोल्हापुरी ज्याला समजली त्याला भाषेचा गोडवा बी कळला आणि त्यो खरा कोल्हापुरी ठरला असच म्हणावं लागलं.

लेखन – पूजा कदम 
Email – kadampooja3006@gmail.com 
Twitter – @iampoojakadam 
Mob- 7798093262 (सौजन्य – हिंदुस्थान टाईम्स मराठी)

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: marathi bhasha marathi bhasha divas आमचं ठरलंय आलतो काटाकीर्रर्र काय भावा काय राण्डंच्या खटक्यावं बॉट गेलतो जाग्याव पल्टी ते नव्हं नाद नाय करायचा मराठी भाषा मराठी भाषा दिवस राण्डच्या लय लांबडं नगं हिकडं कुनीकडं निगालंईस