कोल्हापूर। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अनेक उत्साही आणि बिनडोक लोक रस्त्यावर उतरून प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहेत. आता या अतिउत्साहींना लगाम घालण्यासाठी कोल्हापूरातील सुज्ञ नागरिकांनीच पुढाकार घेतला असून रस्त्यांवर गाड्याचं चालवता येणार नाहीत अशी उपाययोजना करण्यास सुरवात केलीय. सध्या फुलेवाडी येथील सर्वेश पार्क मध्ये लोकांनी अशा प्रकारे रस्त्यांवर वाहने चालवण्यास अडथळे निर्माण केले असून सायकल अथवा दुचाकी देखील यातून बाहेर काढता येणार नाही. त्यामुळे अशा अतिउत्साहींनी लगाम घालणे नक्कीच शक्य होणार असून अशा प्रकारे गावागावात, गल्लीबोळात नागरिकांनी वहातूकीला अडथळे निर्माण केल्यास कोरोनाप्रतिबंधासाठी हे निर्णायक ठरणार आहे.
कोविड 19 (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली.
या अधिसूचनेनुसार-
अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस आणि मेट्रो यांसह एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी तर एका प्रवाशासह ऑटो रिक्षा यांना अधिसूचनेत नमूद केलेल्या कारणांसाठी वाहतूक करता येईल. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी वाहतूक करण्यास अधिसूचनेत मान्यता देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू, आरोग्यसेवा आणि या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या बाबी यांकरिता वाहनचालकांव्यतिरिक्त एका व्यक्तीला खासगी वाहन उपयोगात आणता येईल.