कोल्हापूर। तांबड्या पांढऱ्या रस्स्याचं झणझणीत कोल्हापूर, ही कोल्हापूरची ‘झणझणीत’ ओळख कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही पुन्हा एकदा ठळकपणे सिध्द झालीय. उद्या रविवार २२ मार्च रोजी देशाच्या पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे आठवड्यातील प्रत्येक रविवारी मटणाचा बेत आखणाऱ्या कोल्हापूरकरांनी डगमगून न जाता शनिवारीचं मटण खरेदीसाठी गर्दी केलीय. काही केल्या रविवारचा बेत चुकवायचा नाही असा चंग बांधलेल्या कोल्हापूरकरांनी त्यामुळेच शनिवारी सायंकाळपासूनच मटण खरेदीसाठी रांगा लावल्यात.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत ‘स्वयंम संचारबंदी’ लागू करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्याला सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे. शहरपातळीपासून गावपातळीपर्यंत कोल्हापूरकरांनी या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हायचे ठरवले आहे.
मात्र,त्याची तयारी कोल्हापूरकरांनी शनिवारी संध्याकाळपासूनच सुरू केली आहे. एरवी कोल्हापुरात शनिवारी मटण खरेदी करण्यासाठी फारसे कोणी मटण दुकानाकडे फिरकत नाही. आजचा शनिवार मात्र त्याला अपवाद ठरला आहे.