Categories: Featured राजकीय

मंत्रीमंडळ विस्तारात कोल्हापूरचा ‘चौकार’?

मुंबई।३० डिसेंबर। आज ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार असून या मंत्रीमंडळात कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक वर्चस्व राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल चार मंत्री शपथ घेतील अशी चर्चा आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात कोल्हापूरकडून ‘चौकार’ ठोकला जाणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुरवातीलाच ‘आमचं ठरलयं’ म्हणत कॉंग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात आणला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप हद्दपार झाली. कॉंग्रेसचे चार आमदार निवडून आले, तर भाजप ला खातेही उघडता आले नाही. शिवसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. आता मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करण्यात आणि कॉंग्रेसचे चार आमदार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे. त्यांच्यात आणि करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांच्यात मंत्रीपदावरून थोडीफार रस्सीखेच सुरू होती, परंतु अखेर सतेज पाटील यांनाच हायकंमाड कडून पसंती मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉंग्रेस मंत्र्यांची अधिकृत यादी येथे पहा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार करता जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आणि सलग पाचव्यांदा आमदार झालेले हसन मुश्रीफ यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादीकडून त्यांच्या मंत्रीपदाचा मार्ग पूर्णत मोकळा असल्याने त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालेले आहे. फक्त कोणते खाते मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

शिवसेनेचा विचार करता, जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव आमदार निवडून आला आहे. मागील विधानसभेला कोल्हापूरातून १० आमदारापैकी ५ आमदार एकट्या सेनेचे होते.मात्र यंदा त्याच सेनेचा केवळ एक आमदार निवडून आला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे सोईचे राजकारण, शिवसेनेची अंतर्गत गटबाजी, आणि भाजपसोबतची नडलेली महायुती यामुळे सेनेवर ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे सेनेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात चौथे मंत्रीपद हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने मिळण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रीपद देण्याच्या हालचाली गतीमान झाल्या असून राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्याच्या यादीत राजू शेट्टींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. राजू शेट्टी यांनी निवडणुकीपूर्वीच महाआघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. तर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेट्टी यांनी सन्मानपूर्वक ऑफऱ मिळाल्यास मंत्रीपद स्विकारेन असेही स्पष्ट केले होते.

  • दरम्यान मंत्रीमंडळ विस्तारात वरीलप्रमाणे कोल्हापूरच्या वाट्याला येणारी मंत्रीपदे ही सर्वसामान्य मतदारांच्या भावनांचा विचार करता फिक्स मानली जात आहेत. तर राजकीय गणिते जुळवण्याच्या नादात वरिष्ठ पातळीवरून यात बदल झाला तर आश्चर्य देखील वाटू शकते. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना महाविकास आघाडीसोबत बांधून ठेवण्यासाठी त्यांना शिवसेनेकडून शपथविधीसाठी फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आबिटकर यांची संधी हुकणार असल्याची चर्चा आहे.

Team Lokshahi News