कोल्हापूर। करवीर तालुक्यातील कोपार्डे येथे दिल्लीतील तबलिगी जमातीच्या मरकजमधे सामील झालेले दोन तरूण आल्याने खळबळ उडाली. गावकऱ्यांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांना एका विलगीकरण कक्षात रवाना करण्यात आले. हे तरूण मरकजमध्ये सहभागी झाल्यानंतर गावात येण्यापूर्वी हेर्ले येथे क्वारंटाईन झाल्याचे समजत आहे. या तरूणांसोबत बालिंगे, दोनवडे आणि कोगे येथीलही काही तरूण आल्याची माहिती समजत आहे.
तबलिगी जमातीमुळे देशभरात कोरोनाचा संसर्ग फैलावल्याच्या बातम्यांमुळे या तरूणांना देखील गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे पहायला मिळाले. हे तरूण तबलिगीच्या कार्यक्रमावरून आल्यानंतर हेर्ले येथील मशिदीतील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन केल्याची माहिती आहे.
दरम्यान हेर्ले येथील क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे तरूण सोमवारी रात्री कोपार्डे येथे आले. मंगळवारी सकाळी याची माहिती गावातील तरूणांना कळाल्याने गावात सदर तरूणांविषय़ी संतापाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी ग्रामस्थांनी याची माहिती ग्रामपंचायत, कोरोना समिती, पोलिस पाटील यांना दिली. ग्रामस्थांनी त्यांना सीपीआर येथे पाठवण्याचा आग्रह धरला होता. परंतु त्यांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीमुळे स.ब.खाडे महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे.