Categories: सामाजिक

शौर्य दिनानिमित्त कोरेगाव-भीमामध्ये जनसागर लोटला, अजित पवार- प्रकाश आंबेडकरांकडून विजयस्तंभाला अभिवादन

पुणे।१ जानेवारी। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदाही देशभरातून लाखो अनुयायी जमले आहेत. या पार्श्वभूमीवर या गावात व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे.

शहरात ४०० पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे १० हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड पहारा देत आहेत. सोशल मीडियावरील अफवांमुळे वातावरण बिघडू नये म्हणून २५० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर पेरणे गावाच्या हद्दीत होर्डिंग लावण्यास मनाई करण्यात आलीय. ७४० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी लवकरच कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन केले. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे जात विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी त्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. तसेच प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेवरही समाधान व्यक्त केले. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आज गर्दी होणार असल्याने कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. चार तालुक्यांत जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे.

वहातूक व्यवस्था – 

ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवू नये यासाठी १५ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पुणे- नगर रस्ता बुधवारी वाहतुकीस बंद ठेवला आहे. मुंबई आणि नाशिकहून येणाऱ्या वाहनांना परत जाताना तुळापूर, मरकळ, आळंदी या मार्गे जावे लागणार आहे. सोलापूर, पुणे, सातारा यामार्गे येणारी वाहने ही येताना वाघोलीमार्गे येतील; परंतु, जाताना लोणीकंद, केसनंद, देहू फाटामार्गे सोलापूर महामार्गाकडे जाऊ शकतील.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: अजित पवार कोरेगाव भीमा प्रकाश आंबेडकर