बारामती। कृषिक कृषि २०२० प्रदर्शनास भेट देऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बंधूंसाठी सवलतीची चांगली ऑफर कृषिक अॅपकडून देण्यात आली आहे. १६ ते १९ जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून कृषिक प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, दूग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासह अन्य मंत्रीगण या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीतर्फे आयोजित ‘कृषिक २०२०’ प्रदर्शनास वैयक्तिक किंवा समूहाने भेट देण्यास इच्छुक असलेल्या शेतकरी बांधवांना कृषिक अॅपद्वारे नोंदणी केल्यास प्रवेश शुल्कावर २० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. १५ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत ही ऑफर शेतकरी बंधूना देण्यात आली असून ज्या शेतकरी बांधवांनी नोंदणी केलेली आहे, त्यांनी प्रदर्शनस्थळी ‘कृषिक अॅप’ काउंटवर भेट देऊन आपला ‘एन्ट्री कोड’ स्कॅन करून तिकीट मिळवावे.
ज्या शेतकरी बंधूनी नोंदणी केलेली आहे, परंतु ऑनलाईन पैसे भरलेले नाहीत; अशा शेतकरी बंधूना देखील ‘कृषिक अॅप’ काउंटवर पैसे भरून सवलतीचा लाभ घेता येणार आहे.