Categories: कृषी बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील कोट्यावधी रूपयांची अनोखी ‘तरंगती शेती’; पहा भरघोस नफा मिळवून देणारे हे शेतीतंत्र

कोल्हापूर | जगभरातील तरूणाईचा कल सध्या शेतीकडे असल्याचे पहायला मिळते. परंतु ही तरूणाई पारंपारिक शेती तंत्राला फाटा देत स्वतःच्या कल्पनाशक्तीने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना दिसत आहे. भारतातील वेगवेगळ्या शहरातील असेच दोन तरूण सध्या तरंगत्या शेतीचा प्रयोग घेऊन लोकांसमोर आले आहेत. तसे बघायला गेले तर हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्चशिक्षित असले तरी शेती हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे. 

मयांक गुप्ता (हैदराबाद) आणि ललित झंवर (मुंबई) अशी या दोन तरूणांची नावे असून एकाच शिक्षण आयआयटी मुंबई व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून तर दुसऱ्याचं शिक्षण आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योजकता विषयातून लंडनच्या किंग्जटन विद्यापिठातील. हे दोघेही वयाची नुकतीच तिशी पार केलेले तरूण अॅक्वॉफोनिक अर्थात तरंगत्या तंत्राने शेती करणारे युवा शेतकरी आहेत.  

मयांक आणि ललितने शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने इस्त्राईल, कॅनडा, अमेरिका, चीन, हॉंगकॉंग यासारख्या शेतीतंत्राच्या बाबतीत प्रगतशील देशांना भेटी दिल्या. यातून त्यांना अॅक्वॉफोनिक अर्थात तरंगत्या तंत्राने शेती करण्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या दोघा युवा शेतकऱ्यांनी अवघ्या १५ महिन्यात लॅंडक्राफ्ट कंपनीच्या माध्यमातून शेती क्षेत्रात हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यापूर्वीही भारतात तसेच महाराष्ट्रात अॅक्वॉफोनिक अर्थात तरंगत्या तंत्राने शेतीचा प्रयोग काही जणांनी केला आहे. परंतु तो लहान प्रमाणात आहे. 

शेती करण्यासाठी या तरूणांनी देशातील विविध ठिकाणांची, तिथल्या वातावरणाची, हवामानाची सर्व माहिती घेऊन अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले हे ठिकाण निवडले. हातकणंगले हे ठिकाण निवडताना या दोघांनी इथले हवामान, शेतीच्या पद्धती, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन, पाण्याची व्यवस्था तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दळणवळण या सर्वांचा अभ्यास केला. आणि मगच कोल्हापूर जिल्ह्याला पसंती दिली. कोल्हापूर येथून मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, सुरत अशा कोणत्याही शहरात एका रात्रीत पोहचता येते. तसेच कोल्हापूरपासून सांगली व सोलापूरही शहरेदेखील जवळ आहेत. येथील हवामान व पिकांचे उत्पादन वेग वेगवेगळे आहे. तर कोकणमधील पिकांचाही उपयोग करून घेण्यासारखा असल्याने मध्यवर्ती अशा कोल्हापूरची निवड त्यांनी केली आहे.

मयांक व ललितने इचलकरंजी येथील मित्राच्या मदतीने हातकणंगले येथे दोन एकर जमीन घेतली आहे. या ठिकाणी ग्रीन हाउस उभे करून आतमध्ये ॲक्‍वाफोनिक शेतीसाठी पाण्याचे टॅंक बांधलेत. याठिकाणी तीन बोअरवेल खोदून हे सर्व पाणी फिल्टर करून या टॅंकमध्ये सोडण्यात आले आहे. तसेच मत्स्य शेतीसाठी १३० टॅंक बांधले आहेत. यामध्ये ३० टन मासे सध्या उपलब्ध आहेत. या सर्व माशांची विष्ठा संकलित करून ते खाद्य शेतीला दिले जाते. याठिकाणी ४० प्रकारचा भाजीपाला घेतला जातो. ही सर्व शेती उभारण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च आला असून, मयांकने आपली कंपनी विकून हा पैसा उभा केला आहे. 

ॲक्वाफोनिक शेतीचे तंत्र –
ॲक्‍वाफोनिक हे पाण्याचे छोटे टॅंक बांधून केली जाणारी शेती. यात देशी व विदेशी भाजीपाला कोकोपीटच्या माध्यमातून उगवण्यात येतो. हायड्रोफोनिक व ॲक्‍वाफोनिक या दोन तंत्रज्ञानामध्ये फरक असून हायड्रोफोनिकमध्ये हे रासायनिक खते व औषधांचा वापर केला जातो तर ॲक्‍वाफोनिकमध्ये मत्स्यपालन करून माशांच्या विष्ठेचा खत म्हणून वापर करून केली जाते. मत्सपालन आधारित शेतीच्या या तंत्रातून तयार होणाऱ्या भाजीपाला आणि पिकांना अमेरिकेत सेंद्रिय शेती म्हणून ओळखले जाते.

दररोज फ्रेश भाजीपाल्याची विविध देशात निर्यात व देशातील विविध शहरात विक्री –

भाजीपाल्याला मोठे मार्केट उपलब्ध असले तरी त्या प्रमाणात उत्पादन घेण्यास मर्यादा आहेत. याठिकाणी ललित आणि मयांकने १०० शेतकऱ्यांबरोबर १०० एकर शेतीसाठी करार केला आहे. त्यांच्या शेतीसाठी पाणी परिक्षण, माती परिक्षण करून पिकांबाबत मार्गदर्शन केले जाते. या शेतकऱ्यांच्या शेतातून तयार होणारा भाजीपाला देखील संकलित करून तो विक्री केला जातो. या शेतकऱ्यांना वर्षभरासाठी एकच दर दिला जात असल्याने दर घसरले तरी शेतकऱ्यांची हमीभावाने खरेदी होते. इतर बाजारपेठातील बाजारभावापेक्षा या शेतकऱ्यांना दिला जाणारा दर हा जास्त आहे. शेतकऱ्यांकडील भाजीपाला संकलित केल्यानंतर तो फॅक्टरीत आणून त्याचे पॅकिंग केले जाते. हा पॅकिंग केलेला शेतमाल लॉकडाऊनपूर्वी जर्मनी, सिंगापूर यासारख्या देशातही निर्यात केला जात होता. तर सध्या विविध ठिकाणच्या बाजारपेठा व शहरांमध्ये मागणीनुसार पाठवला जातो. कंपनीच्या या कामात स्थानिक महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. जवळपास १०० लोक याठिकाणी काम करीत असून त्यांना चांगला पगारही दिला जातो.

वास्तविक शेती हा न परवडणारा धंदा म्हणूनच त्याकडे आजपर्यंत पाहिले गेले आहे. परंतु ललित आणि मयांकने तयार केलेला हा प्रयोग याला अपवाद आहे. मयांकने कंपनी विकून भांडवल उभारले आहे. तर त्याच्या या प्रयत्नाला ललितनेही तेवढीच जिद्दीने साथ दिली आहे. यातून या दोघांनी शेती हा फायदेशिर व्यवसाय असल्याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. 

Team Lokshahi News