Categories: आरोग्य सामाजिक

गगनबावडा : “सही पोषण, देश रोशन” अंतर्गत पोषण माह कार्यक्रमाची सुरवात

गगनबावडा | बदलत्या जीवनशैलीमूळे माणसाच्या आहार, विहार यात बदल झाला आहे. यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. शरीर सक्षम ठेवायचे असेल तर रोजच्या आहारात ग्रामीण भागात मिळणा-या पालेभाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. असे मत अंगणवाडी पर्यवेक्षिका वनिता इष्टे यांनी व्यक्त केले. रेव्याचीवाडी येथे आयोजित, “सही पोषण, देश रोशन” याअंतर्गत पोषण माह कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला आपल्या शरिराची प्रतिकारक्षमता वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य यांचा समावेश असणे गरजेचे आहे. पोकळा, राजगिरा, रताळे, शेवगा, आळूची पाने, चवळी, भोपळा, दूधीभोपळा, बटाटा, टोमॅटो, दोडका, भेंडी, कारले यासारख्या स्थानिक ठिकाणी ज्या भाज्या उपलब्ध होतील त्यांचा दररोजच्या आहारात वापर करायला पाहिजे. त्यासाठी आपल्या घराच्या परिसरात एक छोटीसी परसबाग देखील केल्यास अधिक चांगले ठरणार आहे. यामुळे आपल्याला दररोज ताज्या भाज्या पण मिळतील आणि आपला आहार देखील संतुलित राहिल असे मत इष्टे यांनी यावेळी व्यक्त केले. 

यावेळी महिलांनी वेगवेगळया भाज्या,कडधान्य, डाळी यांचा वापर करून पोषण माह बाबत रांगोळ्या काढून याबाबतचे आपले मनोगत सांगितले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वनिता इष्टे, आरोग्य सेवक ठोंबरे, आरोग्य सेविका श्रीमती पिसे, अंगणवाडी सेविका उज्वला बोरये, अंगणवाडी मदतनिस निलम चिले, आशासेविका व लाभार्थी पालक उपस्थित होते.

Team Lokshahi News