Categories: पर्यावरण बातम्या

पंचगंगेचे प्रदूषण करणाऱ्या उद्योग समूहांना टाळे लावा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

कोल्हापूर | पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करणे, विविध उपाययोजना करणे याबरोबरच या कामाच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास माहामंडळ (एमआयडीसी) यांची समनन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पंचगंगेच्या प्रदुषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नदी प्रदुषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना थेट टाळे लावण्यात यावे व त्यांनी नियमांची पुर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पंचगांगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी शासन कार्यवाही तर करेलच, पण त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे प्रदुषण होते त्यांचीही ते रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी आदी ठिकाणांवरुन नदीचे होत असलेले प्रदुषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

पंचगंगा परिसरातील जे कारखाने नियमांचे उल्लंघन करुन नदी प्रदुषणास कारणीभूत ठरतात त्यांना थेट टाळे लावण्याची कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी पुर्तता केल्यानंतर आणि कारखान्यात तशी यंत्रणा बसविल्यानंतरच हे टाळे उघडण्यात यावे, अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांवर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात सहानुभुतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Panchaganga polution