Categories: Featured गुन्हे

दारूसाठी चक्क ‘राज्य उत्पादन शुल्क’ कार्यालयच फोडले, लाखो रूपयांची दारू लंपास

सातारा।लॉकडाऊनमुळे तळीरामांची मोठी अडचण झाल्याने अखेर तल्लफ भागवण्यासाठीराज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून दारूच्या बाटल्या पळवल्यात. ही घटना सातारा जिल्ह्यातील असून तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाळेबंद करून ठेवलेल्या एक लाख ४१ हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूची चोरी केली आहे. याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाई, पाचगणी व महाबळेश्वर परिसरात कारवाईत जप्त केलेल्या देशी-विदेशी दारूचा साठा कार्यालयात ठेवला होता. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून कार्यालयात ठेवलेल्या देशी दारूच्या सुमारे ९०० भरलेल्या बाटल्या व ६७ हजार ४८० रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा एक लाख ४१ हजार ४८० रुपयांचा मालाची चोरी केली. याबाबत जवान उदयसिंह जाधव (रा. बावधन ता. वाई) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मध्यवस्तीत व मुख्य रस्त्यावर हे कार्यालय असताना व परिसरात पोलीस बंदोबस्त असताना चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुसऱ्या घटनेत सैदापूर (ता. सातारा) येथील निकी बंट्स बिअर बार फोडून चोरट्यांनी दारूच्या बाटल्या, सीसीटीव्ही डीव्हीआर, मोडॅम व रोख रक्कम असा सुमारे ७१ हजार ४४० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. २६ मार्चपासून त्यांचा बार बंद आहे. तेव्हापासून ते २९ मार्च या कालावधीत चोरट्यांनी बारचे कुलूप फोडून दारूच्या एक हजार १०३ बाटल्या, सीसीटीव्ही डीव्हीआर, मोडॅम व रोकड लंपास केल्याची फिर्याद प्रवीण अंकुश पवार (रा. सैदापूर, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. 

कोरानामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने जिवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. परंतु यामुळे तळीरामांची मोठी अडचण झाली असून विविध ठिकाणी मद्य चोरीच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

Team Lokshahi News