Categories: Featured आरोग्य सामाजिक

राज्य टप्प्याटप्याने लॉकडाऊनमधून बाहेर पडेल : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई। कोविड-१९ च्या लढ्याविरोधातील लॉकडाऊनबाबतीत राज्य सरकारने परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनमधून टप्प्याटप्याने बाहेर पडेल असे संकेत मिळत आहेत. लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही कायम राहण्याची शक्यता केंद्र सरकारने फेटाळली आहे. मात्र २४ मार्च ते १४ एप्रिल दरम्यानच्या निर्बंधानंतर भारत पुन्हा नव्याने आपला प्रवास सुरु करण्यास सज्ज असेल. त्यामुळे देशव्यापी लॉकडाऊनमधून सर्वच राज्यातील सेवा एकदम सुरु होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतरच याचे संकेत मिळाले होते. (Insurance for Corona warriors – 50 Lakh Personal Medical Insurance)

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊनची परिस्थिती टप्प्याटप्याने सुरळीत करण्याचे संकेत दिले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, राज्यातील संचारबंदी ही टप्प्याटप्याने हटवण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. देशातील कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असताना राज्यातील रुग्णांचा आकडा हा सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाचशेहून अधिक झाली आहे.

देशातील कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च ते १४  एप्रिल दरम्यान देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयापूर्वीच राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्राच्या निर्णयानंतर ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने त्याचवेळी घेतला आहे. त्यामुळे १४  एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या निर्बंधातून आपण मुक्त झालो तरी राज्यातील जनतेला संचारबंदीचे पालन करावे लागेल. 

Rajendra Hankare