पवन डोंगरे –
कोल्हापूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगेच्या प्रदूषण पातळीत घट झाली होती. मात्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे प्रदुषणाची पातळी पुन्हा वाढू लागली आहे. यासंदर्भात प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून ही कोणतीही कारवाई होत नसल्याचे वृत्त लोकशाही.न्यूजने ‘पंचगंगा प्रदुषण : निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे जीवनदायीन्यांचाच जीव धोक्यात..!’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले होते. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या वृत्ताची दखल घेत संबधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिलेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषण जीवघेणे ठरत आहे. काही कारखाने नदी प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवून निगरगट्टपणे कारखान्यातून निघणारे दूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडत आहेत. त्याचबरोबरीने कारखाना परिसरातील शेतात रात्रीच्या दरम्यान रसायनमिश्रित पाणी सोडण्याचा उद्दामपणा देखील करताना दिसतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास नदीकाठच्या गावातील रहिवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाला याची माहिती दिल्यानंतर केवळ नमुने तपासणीचे नाटक करण्यात इथले अधिकारी समाधान मानत असल्याच्या तक्रारी कारखाना परिसरातील लोकांकडून होत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच कडक कारवाई करण्याची मागणी लोकांकडून जोर धरत आहे.