Categories: नोकरी प्रशासकीय सामाजिक

रोजगाराची संधी शोधताय? तीही सरकारी.. मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे

कोल्हापूर | लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. मात्र आता आपले सरकार सेवा केंद्रच्या माध्यमातून लोकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी याबाबत माहिती दिली असून, आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी इच्छूकांनी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, नागरी सुविधा केंद्र यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ असे एकच नामकरण केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा केंद्रे सुरू केली जाणार असून (कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुका वगळून) ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी १ ते ३१ मार्च पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर २७ मार्च रोजी याला स्थगिती देण्यात आली होती. १ ते ३१ मार्च पर्यंत अर्ज केलेल्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

अनलॉक – 5 च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्वीच्या नियमांमध्ये शिथिलता आणत असून नवीन सूचना जारी केल्या जात आहेत. लोकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी देखील प्रयत्न केले जात असून तसे आवाहनही केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रसाठी http://kolhapur.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. डाऊनलोड केलेले अर्ज ३१ ऑक्टोबर या मुदतीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जाणार आहेत.  

  • महत्वाचे- इतर जिल्ह्यातील इच्छूकांनी आपआपल्या तालुका तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे चौकशी करून याबाबत माहिती घ्यावी. आपले सरकार सेवा केंद्र राज्यभरात डिजीटल सेवा देण्यासाठी कार्यरत केली जात आहेत.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र