Categories: Featured

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली..? घाबरू नका, सरकार करेल ‘या’ योजनेतून २४ महिने आर्थिक मदत..!

नवी दिल्ली। देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येऊ लागलीय. खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्यांच्यावर सध्या टांगती तलवार आहे.अनेक शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षण पुर्ण करून खासगी कंपनीत नोकरी करत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे उद्योगधंदेच बंद असल्याने कंपन्यांचे उत्पन्न होत नाही, त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारीवर कुऱ्हाड चालवत आहेत. तर काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून बाजूला करत आहेत. यामुळे देशात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण होणार असली तरी यावर काहीअंशी मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरवात केली आहे. 

जर तुम्ही खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करत आहात आणि जर नोकरी जाण्याची भिती असेत तर काळजी करू नका. कारण सरकार अशा नोकरदारांना ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेतून लाभ देणार आहे. जर तुमची कंपनी तुमच्या वेतनातून पीएफ किंवा ईएसची रक्कम कापत असेल तर या योजनेअंतर्गत तब्बल २४ महिन्यांकरिता सरकारकडून अशा व्यक्तिंना पैसे मिळत राहणार आहेत. याविषयीचे वृत्त लोकसत्ता या वृत्तसंस्थेनेही दिले आहे.

‘कर्मचारी राज्य विमा महामंडळा’च्या (ईएसआयसी) ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. परंतु यासाठी कर्मचाऱ्यांची आधी नोंदणी आवश्यक आहे. ईएसआयसीच्या संकेतस्थळावर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोकरी गेल्यास सरकार त्याला दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. ही मदत दोन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला केली जाणार आहे. बेरोजगार व्यक्तीच्या गेल्या ९० दिवसांच्या  २५ टक्के इतकी रक्कम त्याला मदत म्हणून देण्यात येणार आहे. जे लोक ईएसआयसीशी जोडले गेले आणि ज्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी नोकरी केली आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याव्यरिक्त आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटही डेटाबेसशी जोडलेला असणे आवश्यक आहे.

कशी कराल नोंदणी?

‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ईएसआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या लिंकचा वापर करा. हा फॉर्म भरल्यानंतर तो नजीकच्या ईएसआयसी कार्यालयात जमा करावा लागणार आहे. तसेच यासोबत २० रूपयाचा नॉन ज्युडिशिअल स्टँप पेपरवर नोटरीद्वारे अॅफिडेव्हिट द्यावे लागणार आहे. यामध्ये AB-1 पासून AB-4 पर्यंत फॉर्म जमा करून घेतला जाईल. सध्या यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरच ती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेचा फायदा केवळ एकदाच घेता येऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला चुकीच्या कामामुळे कंपनीतून काढून टाकले असेल, तसेच एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घेतली असेल तरीही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Atal Bimit Vyakti Kalyan Yojana the government will provide financial assistance for 24 months from this scheme अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना