कोल्हापूर।३० डिसेंबर।राज्याच्या मंत्रीमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आमदारांची वर्णी लागल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेले महिनाभर जिल्ह्यात मंत्रीपदावरून विविध नावे चर्चेत होती. यामध्ये शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नाव मात्र कुठेही फारसे चर्चेत नव्हते, त्याच राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आज आश्चर्यकारकरित्या शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळवले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून दुसर्यांदा आमदार झालेले राधानगरीचे आमदार प्रकाश आबीटकर यांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीत शिरोळची जागा स्वाभिमानी पक्षाला मिळाल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूनही आले. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी सत्तासंघर्षात शिवसेनाला पाठींबा जाहीर केला होता.
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पहिल्याच आमदाराचा शिवसेनेला हा पहिला पाठिंबा होता. त्याचवेळी कदाचित शिवसेना प्रमुखांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना संधी देण्याचे मान्य केले असावे अशी चर्चा आता रंगत आहे. त्यामुळे पहिल्यादांच आमदार झालेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना थेट ठाकरेंनी राज्यमंत्रीपदाची संधी दिल्याचे पहायला मिळत आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.