नागपूर | पोलीस भरतीची (Police Bharati) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नागपूर ग्रामीण पोलीस विभागात कॉन्स्टेबल पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Nagpur Rural Police Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून १०८ जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा दिलेले उमेदवार देखील यासाठी पात्र असतील. तसेच उमेदवारांनी सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणे गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी आणि सविस्तर तपशीलासाठी – येथे क्लिक करा

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

नागपूर ग्रामीण पोलीस पदासाठी महिला उमेदवारांची किमान उंची १५५ सेमी तर पुरुष उमेदवारांची किमान उंची १६५ इतकी असणे आवश्यक आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांकडून ४५० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकडून ३५० रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.