मुंबई | एमपीएससीच्या परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससीची सतत परीक्षा देऊन यश येत नसेल आणि पुन्हा परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा (MPSC Exam Age Limit) आणि कमाल संधीचे टेन्शन घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना आता चिंता करण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission)आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. कारण एमपीएससीने कमाल संधीची मर्यादा रद्द केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंबंधिचे ट्वीट करत घोषणा केली आहे. एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर आता वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 डिसेंबर 2020 व दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजीच्या घोषणांद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधीची संख्या मर्यादित करण्याबाबतचा आयोगाचा निर्णय या घोषणेद्वारे रद्द करण्यात येत आहे. त्या अनुषंघाने ज्या त्या प्रवर्गातील/ वर्गवारीतील उमेदवारांना वयोमर्यादेच्या अटी व शर्थीच्या अधीन राहून संधी अनुज्ञेय राहतील.’

दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. यूपीएससीच्या (UPSC) धरतीवर एमपीएससीनेही (MPSC) परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित केली होती. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी 6 संधी, इतर मागासवर्गीयांसाठी 9 संधी असा नियम मर्यादित करण्यात आला होता. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कमाल संधी मर्यादा नव्हती. आता आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थींना वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.