Categories: Featured कृषी

शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर

मुंबई। महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला सुरवात झाली असून २४ फेब्रुवारी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली होती, त्यानंतर आज (२९ फेब्रुवारी) काही जिल्ह्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. (महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना)

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आज सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकऱ्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत १ लाख २५ हजार ४४९  शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकेतील कर्जखात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

आत्तापर्यंत राबवण्यात आलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अपेक्षित कर्जखात्यांची संख्या ३६.४५ लाख आहे. पोर्टलवर आतापर्यंत अपडेट झालेल्या खात्यांची संख्या ३४.९८ लाख आहे. यादी प्रसिध्द झालेल्या खात्यांची संख्या २१.८२ लाख असून यासाठी १४ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या १५ आहे. तर ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अंशतः यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या १३ आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने ६ जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सरकारने जाहीर केलेल्या या योजनेसाठी आत्तापर्यंत १ लाख २५ हजार ४४९ खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यात प्रमाणीकरणानंतर व्यापारी बॅंका २४ तास, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका ७२ तासात लाभाची रक्कम जमा करणार आहेत. 

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: farmer loan wavier scheme Loan waiver announced pm Kisan scheme पीएम-किसान योजना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकरी कर्जमुक्ती यादी २०१९ शेतकरी कर्जमुक्ती योजना