Categories: कृषी

शेतकरी कर्जमाफीचा लाभ आजपासून, पहा किती गावाची लागणार यादी

मुंबई।महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ आज (ता. २४) पासून शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थ्यांची यादी लावण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी २८ फेब्रुवारीपासून लावण्यात येईल. यासंबधींची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

कर्जमाफीची योजना राबविताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यात येतील आणि एप्रिल २०२० अखेरपर्यंत सर्व अंमलबजावणी व्हावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. सोमवारी (२४ फेब्रुवारी) ६८ गावांची यादी लावण्यात येईल आणि लाभही तात्काळ मिळतील, असे ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आतापर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचे आकडे समोर आले असून, त्या सर्व ३५ लाख शेतकऱ्यांची एप्रिल अखेरपर्यंत सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत, याची पूर्ण दक्षता घेतली असून, त्यामुळेच ही योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर तब्बल साठ महिने कर्जमाफीची योजना सुरू असल्याचा चिमटा काढत विद्यमान महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी मात्र केवळ तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल, अशी घोषणा ठाकरे यांनी या वेळी केली. सध्या काही शेतकऱ्यांनी आधार कार्ड बॅंक खात्यांशी संलग्न केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया करून घ्यावी असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. 

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: crop insurance farm insurance Insurance Mahatma jotirao phule farmer loan waiver scheme 2020 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकरी कर्जमाफी