farmer loan waiver scheme
कोल्हापूर। महाराष्ट्र सरकारने ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेअंतर्गत राज्यातील थकीत कर्जदारांना २ लाख रूपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासादायक निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे. यासाठी उपसमितीमार्फत आढावा घेण्याचे काम सुरू असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरात यासंबधी माहिती दिली असून प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रूपयांपर्यंत माफी देण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले आहे. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी मंत्री मुश्रीफ यांनी याविषयी माहिती दिलीय.
हे ही वाचा – शेळीपालन करायचं आहे? राज्यसरकारच्या ‘या’ योजनेचा जरूर लाभ घ्या…!
सध्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून थकीत कर्जदारांना त्यांची जमीनधारणा विचारात न घेता २ लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. वारंवार थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जात असल्याने, राज्यातील प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप होऊ लागला होता.
काही शेतकरी कर्जमाफी होणार या हेतूने कर्ज थकीत करत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करून आम्ही चुक केली का असा सवालही शेतकरी वर्गातून उपस्थित होत होता. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफी देण्यात येईल असे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते. त्यासंबंधीची कार्यवाही पूर्ण होत आली असून लवकरच याविषयी निर्णय स्पष्ट केला जाण्याची अपेक्षा आहे.