मुंबई | महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया अखेर राज्य सरकारने सुरु केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. यासाठी राज्यसरकारने दोन हजार कोटींचा निधी सुद्धा वितरीत केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या बोजातून मुक्त करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरु असताना देशासह राज्यात कोविड-१९ चे महासंकट उभे ठाकले. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे, कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय कामे करणे यासारख्या गोष्टी करण्यात आल्या. परिणामी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी निर्माण झाल्या. तसेच सरकारला कोरोनाविरूध्द आरोग्ययंत्रणा आणि उपचारांसाठी बराचसा निधी खर्च करावा लागला. यासर्व बाबींमुळे तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला.
सध्या खरीप परेणीचा हंगाम सुरु झाला आहे. तिसऱ्या यादीतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी २ हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सव्वा अकरा लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात सुमारे ८ हजार २०० कोटी रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सर्व शेतकऱ्यांना आता यामुळे पीक कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. बहुतांशी जिल्ह्यातील मध्यवर्ती बॅंकांनी यापूर्वीच कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या परंतु कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची प्रक्रिया पार पाडलेली आहे.