farmer loan waiver scheme
मुंबई। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दोन याद्या जाहीर झाल्या असून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, पहिल्या यादीपासूनच तांत्रिक अडचणी सुरु झाल्या असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय. यादीतील काही शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी जुळत नसल्याने त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया खोळंबत आहे. त्यामुळे आधार क्रमांक दुरुस्त केल्यानंतरच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. असं असलं तरी हा सुधारित आधार क्रमांक शासनाच्या सर्व्हरवर अपलोड कोण आणि कधी करणार हा प्रश्न निर्माण झालाय. यामुळे काही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून सध्यातरी वंचित झाल्याचे चित्र आहे.
पहिल्या यादीतील काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँकेच्या केवायसीमध्ये वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे निघाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या आधारमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, योजनेच्या सर्व्हरवर दुरुस्त आधार क्रमांक कोणी अपलोड करायचा असा प्रशासकीय गोंधळ सुरु आहे. याचा थेट फटका चिंताग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. दुसरीकडे शासनस्तरावर याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती जिल्हा निबंधकांकडून दिली जात आहे. वर्धा जिल्ह्यात पहिल्या यादीत या प्रकाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्याची संख्या ८ आहे. ही संख्या सध्या कमी दिसत असली तरी राज्याचा विचार केल्यास हा आकडा मोठा होण्याची शक्यता आहे.
कर्जमाफीच्या यादीत मृत झालेल्या शेतकऱ्यांचीही नावे येत असल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. अशाच एका घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आल्याने आधार प्रमाणीकरणासाठी त्यांचा अंगठा मिळणे शक्य नाही. त्यासाठी प्रशासनाने वारसदारांची नोंद करण्यास सांगितले आहे. मात्र वारस नोंद करून देखील अद्याप लाभ मिळाला नसल्याने असे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून अद्याप वंचित आहेत.
मागील सरकारच्या कर्जमाफी योजनेत शेतकरी ऑनलाईनच्या कचाट्यात सापडलेला होता, तर या सरकारनं जाहीर केलेल्या योजनेत शेतकऱ्याला फक्त आधार प्रमाणिकरणाची गरज आहे. मात्र अनेकांच्या आधारमध्ये असलेला घोळ शेतकऱ्यांसाठी मनस्ताप देणारा ठरतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले तरी आधार प्रमाणीकरण झाल्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही स्वतःहून आधार प्रमाणीकरण करून घेणे आणि त्याविषयी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.