कोल्हापूर | जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. गोकुळ, केडीसीसी बॅंक, इतर काही साखर कारखाने तसेच छोट्या-मोठ्या संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षात घडामोडींना वेग आला आहे. असे असले तरी सहकारी संस्थांमध्ये महाविकास आघाडी की गटा-तटांच्या सोयीनुसार राजकारण रंगणार याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. या सहकारी संस्थांत गोकुळ दूध संघ हे अति महत्त्वाचे राजकीय आणि आर्थिक सत्ता केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे एकवेळ आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा, अशी विनवणी अनेकजण नेत्यांकडे करतात. मागच्या पाच वर्षापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी आघाडी करून गोकुळची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत या तिन्ही नेत्यांना अत्यंत कमी मतांच्या फरकाने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. दरम्यान, पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या. दरम्यान मल्टिस्टेटचा निर्णय एकाधिकारशाहीने घेतल्याचा आरोप करीत ना. मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
गोकुळमधील सत्ताधाऱ्यांचा कारभार पाहता, ‘गोकुळ’मधील नेतृत्वावर नाराज असलेले अनेक ज्येष्ठ संचालक सध्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. यातूनच ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी महाडिक यांच्याऐवजी मुश्रीफांचे नेतृत्व मान्य केले आहे. तसेच हा केवळ ट्रेलर असून, पिक्चर अजून बाकी आहे, असेही त्यांनी सूचित केले आहे. यामुळे ‘गोकुळ’मध्ये राजकीय उलथापालथी होण्यास सुरूवात झाली आहे.
दरम्यान, विधानसभा, जिल्हा परिषद, विधानपरिषदे पाठोपाठ आता गोकुळची निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय झाल्यास महादेवराव महाडिक यांचे सहकारी आणि काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे. गोकुळसोबत जिल्हा बॅंकेच्या बाबतीतील चित्र देखील सध्या अस्पष्ट आहे. यापूर्वी केडीसीसीची निवडणूक पक्षीय पातळीपेक्षा गटतट, आघाड्या एकत्र येऊनच लढवली गेली आहे. सध्या जिल्हा बॅंकेत मुश्रीफांची एकहाती सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी बँकेच्या कामकाजावर चांगली पकड मिळवली असून बॅंक सुस्थितीत आणली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वाखाली होईल, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला याठिकाणी कितपत स्थान मिळणार, हे पहावं लागणार आहे.
याबरोबरच, मागील वेळी राजकीय आखाडा बनलेल्या कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यांची निवडणूकही यावेळी प्रतिष्ठेची होणार आहे. याठिकाणी महाडिक विरूध्द सतेज पाटील असेच चित्र रंगणार असले तरी सत्ता खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधली जाणार का हे पहावं लागणार आहे. बहुतांशी सहकारी संस्थांमध्ये स्थानिक राजकारणाच्या सोईनुसार लढत होत असते. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध सर्व असेच चित्र पहायला मिळेल असेच सध्यातरी दिसत आहे.