नवी दिल्ली | केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना पीएम किसान योजनेत सरकारने महत्वपूर्ण बदल केल्याने देशातील आणखी २ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी २ हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याची घातलेली अट रद्द केली असून आता सर्वप्रकारच्या जमिन धारकांसाठी ही योजना लागू केली आहे.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा देशातील आणखी २ कोटी शेतकऱ्यांना होणार असून त्यांना वर्षाला ६००० रूपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रूपयांची आर्थिक मदत देत असून त्याचा लाभ देशातील जवळपास १२.५ कोटी शेतकऱ्यांना देण्यासाठी यंत्रणेने याआधीच नियोजन केले आहे. तर सरकारच्या उद्दिष्टानुसार २ हेक्टर पर्यंत जमीनीची अट रद्द केल्याने जवळपास १४.५ कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना ७२ हजार कोटी रूपयाचे वाटप सरकारने केले आहे. तर प्रत्यक्ष लाभ जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत.
पुढील हप्ता ऑगस्ट २०२० मध्ये देण्याचे नियोजन आहे. बदलेल्या अटीनुसार शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास जुलै महिन्यात अर्जाची पडताळणी होऊन ऑगस्ट मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाविलंब नवीन अर्ज नोंदणी या लिकंवर जाऊन केल्यास त्यांना घरबसल्या या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच काही सुधारणा करायच्या असल्यास अपडेशन या लिंकवर त्या करता येतील. ज्या शेतकऱ्यांना स्वतः अर्ज भरणे शक्य नाही त्यांनी तलाठी कार्यालय, कॉमन सर्विस सेंटर याठिकाणी जाऊन देखील अर्ज केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.