Categories: महिला सामाजिक

…म्हणून मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी केलं ‘या’ मुलीचं कौतुक.. पहा कोण आहे ‘ती’?

पुणे | मन जिंकलंस लेकी.. तुला भेटायला नक्की आवडेल. रोग येतील जातील, पण हे स्पिरीट हवं जगण्याचं. आपल्याला रोगाशी सामना करायचाय रोग्याशी नाही हा संदेश देणारा मस्त व्हिडीओ. अशा शब्दात महिला व बालकल्याण विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी सोशल मिडीयावरील एका व्हायरल व्हिडीओवर आपलं मत व्यक्त केलयं.

हा व्हिडीओ आहे, पुण्याच्या धनकवडी भागातील आंबेगाव पठार येथील स्वामी समर्थ नगर भागात राहणाऱ्या सलोनी सातपूते हिचा… या तरुणीने कोरोनाच्या खडतर काळात सकारात्मक कसं रहायचं याचं एक उदाहरणच व्हिडीओच्या माध्यमातून घालून दिलंय.. सलोनीच्या घरातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. एकट्या सलोनीचा अहवाल निगेटीव्ह होता. महत्वाची गोष्ट म्हणजे पाचही जणं कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. दरम्यान सलोनीची बहिण स्नेहल देखील नुकतीच कोरोनावर मात करुन घरी परतली. यावेळी सलोनीने अनोख्या स्टाईलने, हट जा रे छोकरे….गाण्यावर डान्स करुन आपल्या बहिणीचं स्वागत केलं. सलोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बघता बघता चांगलाच व्हायरल झाला. आजुबाजूला गंभीर वातावरण असतानाही सकारात्मक आणि हसतमुखाने संकटाचा सामना करणाऱ्या सलोनीचं यामुळे सोशल मीडियावरही कौतुक होऊ लागलं. महिला व बालकल्याण विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी देखील सलोनीच्या व्हिडीओची दखल घेत मन जिंकलंस लेकी… म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात.

पाचही जणांवर रुग्णालयात उपचार होत असताना, सलोनीला घरात एकटं रहावं लागलं होत. साहजिकच घरात एकटं रहावं लागल्यामुळे सलोनीला प्रचंड मानसिक त्रास होत होता. अशावेळी शेजारच्या लोकांनी आपल्याला दिलेली वागणूक सलोनीला जास्त खटकली. नेहमी आजुबाजूचे बोलणारे लोक, विचारपूस करणारे लोक या काळात सलोनीशी अजिबात बोलत नव्हते किंवा तिला ओळखही दाखवत नव्हते. अशावेळी पूर्णपणे खचून जायला होतं. त्या काळात मला आजुबाजूच्या लोकांकडून मानसिक आधाराची गरज होती, पण दुर्दैवाने असं झालं नसल्याचं मत सलोनीने व्यक्त केलंय.

  • “आई-बाबा, आजी-आजोबा कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर मला जरा आधार मिळाला. बहिण ज्या दिवशी घरी येणार असं समजलं त्यादिवशी तिचं स्वागत करायचं मी ठरवलं होतं. खरतर डान्स करायचा असं मी ठरवलं नव्हतं. पण बहिणीला समोर पाहिल्यानंतर मला राहवलं नाही आणि इतक्या दिवसांचा तणाव मी डान्सच्या माध्यमातून मोकळा केला” असं सलोनीने सांगितलं.
  • “आपलं अशा पध्दतीने स्वागत होईल असं वाटलं नव्हतं” अशी भावना यावेळी सलोनीची बहिण स्नेहलनेही व्यक्त केली.
Team Lokshahi News