बंगळुरु। पत्नीच्या साफसफाईच्या सवयीला कंटाळून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कर्नाटकमध्ये ही घटना घडली असून पुत्तामणी (३८) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शांतामूर्ती (४०) असे तिच्या पतीचे नाव असून दोघांचे १५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. आई वडिलांच्या मृत्युमुळे त्यांची मुले मात्र पोरकी झाली आहेत.
नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुत्तामणी स्वच्छतेचा अतिरेक करायची. तसेच ती अंधश्रद्धेवरही फार विश्वास ठेवत असे. तिच्या घरी येणाऱ्या व्यक्तींनाही ती घरात येण्यापूर्वी आंघोळ करुन येण्यास सांगत असे. यावरुन अनेकांनी त्यांच्या घरी जाणं-येणं बंद केलं होतं. इतकंच नव्हे तर, ती आपल्या दोन्ही मुलांना दिवसांतून अनेकवेळा आंघोळ घालायची. विशेष म्हणजे तिचा पती शांतामूर्ती तिला जे पैसे देत असे, त्या नोटाही ती धुवून सुकवून वापरत असे. “नोटांना विविध जातीचे लोक स्पर्श करतात. त्यामुळे नोटा अपवित्र होतात,” असे पुत्तामणी अनेकांना सांगत असल्याची माहिती तिच्या शेजाऱ्यांनी दिलीय.
तिच्या या साफसफाईच्या सवयीला अनेकजण कंटाळले होते. यावरुन त्या पती-पत्नीमध्ये कायम भांडण होत असतं. काल (१९ फेब्रुवारी) शांतामूर्ती आणि पुत्तामणी यांच्यात याच कारणावरून पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे वारंवारच्या या भांडणाला वैतागलेल्या शांतामूर्तीने शेतात बाजूला असलेली कुऱ्हाड उचलत तिच्यावर सपासप वार केले. पत्नीची हत्या केल्यानंतर शांतामूर्ती घरी परतला आणि त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोन्ही मुले शाळेतून घरी परत आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय. मुलं शाळेतून परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं पाहिलं. मुलांनी याची माहिती शेजाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी पुत्तामणीची शोधाशोध सुरु केली. तेव्हा तिचा मृतदेह शेतात आढळून आला. या प्रकारानंतर मुलांवर पोरकं होण्याची वेळ आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.