Categories: Featured

मांडुकली : मयत कोरोनाबाधिताच्या अंत्यविधी संपर्कातून आणखी दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह, तालुक्यात खळबळ

गगनबावडा | मांडुकली येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यापैकी मांडुकली येथील ३९ वर्षीय पुरूषाचा तर साखरी येथील ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. हे दोघे मांडूकली येथील मयत कोरोनाबाधिताच्या अंत्यविधी कार्यक्रमामुळे संपर्कात आले होते. संपर्कातील एकूण ६२ जणांचे स्वॅब  घेण्यात आले होते. त्यातील दोन अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  

तालुक्यातील मांडूकली येथील एक व्यक्ती बायपाससाठी कोल्हापूरातील दवाखान्यात उपचार घेत होती. ज्या दवाखान्यात हे उपचार सुरू होते, त्या दवाखान्यातीलच एकास कोरोनाची लागण झाल्याने मांडूकली येथील उपचार घेणाऱ्या रुग्णाचे आणि त्यांच्या सेवेसाठी असलेल्या त्याच्या भावाचे, दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान मांडुकलीतील ज्या रूग्णावर उपचार सुरू होते, त्यांचा डिस्चार्ज मिळाल्यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाला होता. परंतु आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे सदर मयत रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असताना देखील निगेटिव्ह सांगितला गेल्याने त्यांच्यावर मांडूकली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 

 दरम्यान मयताचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाल्याने, या कोरोनोबाधिताच्या अंत्यविधीला उपस्थित असणारे आणि मयताच्या भावाच्या संपर्कात आलेल्या ६२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी २ रिपोर्ट पॉझिटिव्ह असून साखरी येथील महिला आणि मांडुकली येथील पुरूष यांचा समावेश आहे. आता या दोन जणांच्या संपर्कात आणखी कितीजण आले आहेत याची माहिती मिळवण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. 

Team Lokshahi News