कोल्हापूर। महिलांनी बचत गटातून कर्ज घेवून नुसती परतफेड न करता उद्योग व्यवसाय करण्यावर भर द्यावा. काही अडचण असेल तर माविम व ULB शी संपर्क साधावा. तसेच बचत गटातील महिलांना शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त निखील मोरे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उपायुक्त मोरे म्हणाले, माविम व महानगरपालिका DAY NULM सोबत समन्वय हा चांगला आहे. बचत गटातील महिलांनी कचरा व्यवस्थापनामध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याकरिता App चा वापर करावा. प्लास्टिक मुळे होणाऱ्या दूष्परिणामाला रोखण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करावा. DAY NULM मधील शहरातील बचत गटातील महिलांना रोजगार संधी मिळावी व महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता City Livlihood Centre (CLC) तयार केली असून त्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून सर्व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा.
माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये माविम अंतर्गत १०८ गावात, १ महानगरपालिका व ९ नगरपरिषद मध्ये ३८०० बचत गटाच्या माध्यमातून ५३ हजार ६२९ महिलांचे संघटन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यास बँक ऑफ महाराष्ट्रचे उपझोनल व्यवस्थापक वी. जी. कोमावार, आयसीआयसी बँकेचे विभागीय प्रमुख योगेश भट, जागृती संस्थेचे अध्यक्ष संदीप पवार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, महानगरपालिका DAY NULM चे रोहित सोनुर्ले व राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य शारदा गवंडी आदी उपस्थित होते.