Categories: Featured अर्थ/उद्योग कृषी सामाजिक

गोकुळचा टॅंकर फोडून स्वाभिमानीच्या दूध दर आंदोलनाला सुरवात..!

मुंबई : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेले दूध दर आंदोलन पेटले असून आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. संतप्त आंदोलनकर्त्यांनी सांगलीत गोकुळ दूध संघाचा दूध टँकर फोडून २५ हजार लिटर दूध रस्त्यावर ओतलय. तर कोल्हापूरातील बिद्री येथे देखील दूधाचा टॅंकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून दिलय. स्वाभिमानीच्या दूध दर आंदोलनातून युटर्न घेत गोकुळ दूध संघाने माघार घेऊन पाठिंबा काढला होता. आंदोलनकर्त्यांनी यावेळी रस्त्यावरील दूध वाहतूक देखील रोखली. दिवसाच्या सुरवातीलाच स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने दूध दरावरून आक्रमक होत आपली भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे दिवसभरात राज्यभर या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यातील एलूर फाट्याजवळ पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी आंदोलन केलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा भडका उडाला. दूध उत्पादक शेतकऱ्याला दुधाचा योग्य भाव द्या, गाईच्या दुधाला प्रति लिटर २५ रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव द्या या मागणी साठी आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

दूध दरासंदर्भात आज मंत्रालयात बैठक
दूध दरासंदर्भात आज मंत्रालयात दुपारी 2 वाजता मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली आहे. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, दूध संघाच्या प्रतिनिधींना यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

दूधावरील GST मागे घ्यावा, राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५ रूपये अनुदान द्यावं, दूध भुकटीला निर्यात अनुदान ३० रूपये द्यावं इत्यादी मागण्यासह हे आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यात इतरत्र १८ ते २० रुपये लीटरने दूधाची खरेदी केलं जातं असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. 

स्वाभिमानीने सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकाळपासूनच दूध दर आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी गावांमध्ये मंदिरात दुग्धाभिषेक केला, तर काही ठिकाणी मोफत दूध वाटप देखील सुरू आहे. या आंदोलनात गोकुळ दूध संघाची वाहने लक्ष्य केल्याचे दिसत आहे. गोकुळ दूध संघाने सुरुवातीला स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी सकाळचे दूध संकलन थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुग्ध विभागाची नोटीस येताच युटर्न घेत संघाने हा निर्णय बदलाला होता. गोकुळ दूध संघाने यू-टर्न घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संघाची वाहने लक्ष्य केली जात असल्याची चर्चा होत आहे.

Team Lokshahi News