Categories: कृषी

दूधदरवाढ आंदोलन : सरकारच्या निषेधार्थ दगडालाच घातला दूधाचा अभिषेक..!

अहमदनगर | दूध दरवाढ प्रश्नी राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आलयं. यावेळी शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालत रस्त्यावर दूध ओतून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केलाय. यात किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह अनेकजण सहभागी झाले आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात आज सोमवारी (२० जुलै) हे आंदोलन केल जात आहे. यात अनेक शेतकरी संघटना आणि पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलनकर्त्यांनी दुधाला प्रतिलीटर ३० रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यासाठी शेतकरी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार पाषाण हृदयी असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचाही आरोप केला. या आंदोलनात किसान सभेचे डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, सुरेश नवले आदी नेत्यांनी सहभाग घेतला.

रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवरही दगडाला दुधाचा अभिषेक करुनही केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. भाजपच्या वतीने आज सकाळी ११ वाजता संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव दर देण्याची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, महायुतीने देखील आज दुध प्रश्नावर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • दुधाला प्रतिलीटर ३० रुपये दर द्या
  • केंद्रसरकारने घेतलेला दूधपावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा
  • दुधाला रास्तभाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर १०रुपये अनुदान वर्ग करा
Team Lokshahi News