Categories: Featured

शेतकऱ्यांच्या ‘या’ प्रश्नावर राज्यमंत्री बच्चू कडूंचा राज्यसरकारला घरचा आहेर; म्हणाले…

अमरावती | आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिध्द असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. बच्चू कडू यांनी “राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात गंभीर नसल्याचा थेट आरोप करत, राज्यातील कृषी खातं झोपलं आहे काय?” असा सवाल उपस्थित केलाय. 

विदर्भामध्ये सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पिकांची पाहणी केल्यानंतर बच्चू कडूंनी “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघाले. आता पिकावर रोग येत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय” असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिलेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पिकांची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहेत. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत देणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

Team Lokshahi News