कोल्हापूर।१ जानेवारी।काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर मतदारसंघातील आमदार पी एन पाटील हे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रीमंडळ विस्तारात डावलल्याने कार्यकर्त्यांनी पी एन पाटील यांच्यावर दबाव आणल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भात आज पी एन पाटील समर्थकांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यात सामूदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. या मेळाव्याला आमदार पीएन पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या निर्णयावर आमदार पी एन पाटील स्वतः काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातून काँग्रेसने सतेज पाटील यांना स्थान दिलंय. त्यामुळे ४० वर्षे कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचा सूर आळवत पी एन पाटील समर्थकांनी सोशल मिडीयावरून आपली नाराजी व्यक्त करायला सुरवात केली होती. त्याचसंदर्भात आज कार्यकर्त्यांनी मेळाव्याचे आयोजनही केले होते. यावेळी अनेक पदाधिकांऱ्यांनी राजीनामे देत पी.एन.पाटील यांना डावलल्याने नाराजी प्रकट केली.
दरम्यान सतेज पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार हे निश्चित झाल्यापासून आमदार पी.एन.पाटील समर्थक आणि राज्यमंत्री सतेज पाटील समर्थकात सोशल मिडीया वॉर सुरू झाल्याचे पहायला मिळाले होते. हे सोशल वॉर अद्याप थांबले नसून एकमेकांविरोधात पोस्ट लिहिणे चालूच असल्याचे पहायला मिळत आहे.