Categories: राजकीय

तर आपण सर्वांनी बघितलेले ‘ते’ स्वप्न पूर्ण होऊ शकतं – आ. रोहित पवार

औरंगाबाद। सध्या राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी लोकसभाही महाविकासआघाडीने एकत्र लढविली पाहिजे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे,” असं आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांच्या सेवा गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी रोहित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले की, तुमचं, माझं, आपल्या सर्वांचं एक स्वप्न आहे. २०२४ ला लोकसभा निवडणुका आहेत. आणि आमचे सर्वांचे नेते शरद पवार अजूनही तरुण आहेत. त्यामुळे आपण एकत्र निवडणुका लढू.  जसे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आहोत, तसेच लोकसभेतही एकत्र येऊन निवडणुक लढलो तर एक मराठी माणूस त्या ठिकाणी जर गेला, तर आपण सर्वांनी बघितलेले स्वप्न पूर्ण होऊ शकतं. 

यावेळी रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला. “जर एखाद्या नेत्याचा लोकांवर विश्वास नसेल तर त्या नेत्याला एखाद्या पत्रकाराशी बोलताना सुद्धा आपले बूट हातात घ्यावे लागतात. त्यामुळे अशाप्रकारचा विश्वास आपल्याला नको आहे. आपल्याला खरा विश्वास पाहिजे की आपली लोकं आपल्यासोबत आहेत,” “विश्वास असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि शरद पवारांवर लोकांचा विश्वास आहे. शरद पवार जेव्हा कुठेही जातात, त्यावेळी सर्व सामन्यांना काय पाहिजे हे समजून घेतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे,” असेही रोहित पवार पुढे म्हणाले. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: loksabha 2024 mahavikas aaghadi MLA Rohit pawar NCP PM 2024 Sharad Pawar महाविकास आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस रोहित पवार लोकसभा २०२४ शरद पवार