Categories: राजकीय

भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी मनसे रिंगणात; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसैनिक आक्रमक

नागपूर | मनसेने गाव पातळीवरुन संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजपचा गड असलेल्या नागपूर जिल्ह्यापासून सुरवात करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. 

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात 130 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार नागपूर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गाव पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी मनसे सध्या आक्रमक झाली आहे. मनसेच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे मनसेचे नेते हेमंत गडकरी यांनी सांगितले. मनसेच्या एन्ट्रीमुळे नेमका कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, हे 18 जानेवारीलाच कळणार आहे.

नागपूर जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात किती ग्रामपंचायतीत निवडणुका
तालुका – ग्रामपंचायतीची संख्या
काटोल – 03
नरखेड – 17
सावनेर – 12
कळमेश्वर – 05
रामटेक – 09
पारशिवनी – 10
मौदा – 07
कामठी – 09
उमरेड – 14
कुही – 25
नागपूर ग्रामीण – 11
हिंगणा – 05

नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघात 39 ग्रामपंचायतींच्या निवडणूका आहेत. याठिकाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी चांगली ताकद लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची यासाठी तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपनेही याठिकाणी जोर लावला आहे. यातच आता मनसेने एन्ट्री केल्याने ग्राम पंचायत निवडणुकीत रंगत आली आहे. त्याचे परिणाम काय होणार? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी थेट राज ठाकरेंचे आदेश – 

राज्यातील महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, मनसे ग्रामपंचायत निवडणुका लढणार असली तरी किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेलं नाही. मात्र, स्थानिक नेतृत्व परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असं मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितल आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: BJP Grampanchayat election 2020 MNS