Categories: Featured सामाजिक

मोदींना आवडलेली ‘कोई भी रोडपे ना आये’ ही जाहिरात संकल्पना कोल्हापूरची

कोल्हापूर। कोरोनाची भयावहता दाखविणारे आणि रस्त्यावर फिरु नका असे सांगणारे ‘कोई भी रोडपे ना आये’ या जाहिरात डिझाईनचे कौतुक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला उद्देश्शून केलेल्या भाषणादरम्यान व्हायरल केले. विकास सदानंद डिगे या कोल्हापूरच्या कलाकाराची ही मूळ संकल्पना विकासच्या रूपाने कोल्हापूरच्या कलाकाराचा सन्मान केला आहे. आम्ही कोल्हापूरी, जगात भारीचे प्रत्यंतर यानिमित्ताने पुन्हा एकदा आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री केलेल्या भाषणातून कोरोना विषाणूविषयी काळजी घेण्याचे आणि देशात २१ दिवस लॉक डाउन करण्याची घोषणा केली. या भाषणादरम्यान कोरोना : ‘कोई भी रोडपे ना आये’ असे लिहिलेल्या जाहिरातीचा फलक दाखवून कोरोना विषाणूविषयी सावध राहण्याचे आवाहन केले. ही संकल्पना आवडल्याने मोदींनी कौतुक करुन या संकल्पनेचा उल्लेख केला.

या जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरचे पहिले खासदार शंकरराव खंडेराव डिगे यांचे नातू आणि चळवळीतील कार्यकर्ते व एस.के. डिगे फौंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांचे चिरंजीव विकास डिगे यांची आहे. सदानंद डिगे यांना महाराष्ट्र सरकारचा समाजभूषण पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांचे चिरंजीव विकास यांनी कलानिकेतन महाविद्यालयातून कमर्शियल आर्टची पदवी घेतली आहे. गेली सात वर्षे ते अ‍ॅड टुमारो अ‍ॅडव्हर्टायजिंग स्टुडिओ ही स्वत:ची जाहिरातविषयक कंपनी चालवतात.

कोरोनाविषयी चालविलेल्या मोहिमेसाठी तयार केलेल्या ‘कोई भी रोडपे ना आये’ या जाहिरातीच्या संकल्पनेत अतिशय सोप्या शब्दात या विषाणूविषयीची भयावहता मांडण्यात आली आहे. ही जाहिरात १९ आणि २० मार्च रोजी सोशल मिडियावरुन खूपच व्हायरल झाली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू रविवार, दि. २२ मार्च रोजी जाहीर केला. यावेळी खुद्द मोदीजींनीच या संकल्पनेचा उल्लेख करत लोकांना संबोधित केले.

Team Lokshahi News