Categories: मनोरंजन

ऋषीकेश जोशी यांच्या ‘मोगरा’ नाटकाचा कोल्हापूरकरांसाठी खास ‘ऑनलाईन’ प्रयोग

कोल्हापूर | कलानगरी कोल्हापूरचे सुपुत्र ऋषीकेश जोशी यांच्या संकल्पना – दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘मोगरा’ या ऑनलाईन नाटकाचा प्रयोग शनिवार १ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘पाच जणी पाच ध्येय’ या संकल्पनेवर हे नाटक आधारित आहे. हा प्रयोग खास कोल्हापूरकरांसाठी होणार असून याचा नाट्यप्रेमींना घरबसल्या आनंद घेता येणार आहे. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नाट्यगृहे बंद आहेत. तरी नाट्यप्रेमींचे मनोरंजन करता यावे या उद्देशाने ऋषीकेश जोशी आणि टीमने हा पुढाकार घेत ऑनलाईन नाटक सादर करण्याचे आव्हान स्विकारले आहे. मराठी रंगभूमीवरील हा एक आगळा आणि क्रांतिकारी प्रयोग ठरणार असून ऑनलाईन माध्यमातून खास कोल्हापूरकरांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील पुणे, मुंबई तसेच जगभरातील फिनिक्स, मेलबर्न, सिडनी या शहरांमधील प्रयोगानंतर कोल्हापूरच्या या प्रयोगाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या आपल्या राहत्या घरातून दिवाणखान्यात घरच्या सर्व मंडळींसोबत बसून नाटक पाहण्याची ही संकल्पना सर्व नाट्यरसिक प्रेक्षकांना आवडली आहे.

या नाटकात स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे, मयूरा रानडे आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाची ऑनलाईन तिकीट विक्री सुरू असून आसनक्षमता ५०० एवढी आहे. अधिक माहितीसीठी www.hungamacity.com येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात  आले आहे.

दुरध्वनी क्रमांक : ९५४५२५९५९८ / ७०३०३६४१०३

Team Lokshahi News