मुंबई | हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसारगुरुवारी तळकोकणात मान्सून दाखल झाला. तर शुक्रवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागापर्यंत मजल मारली. सध्या मान्सून सोलापूरमध्येही दाखल झाला असून गेल्या २४ तासांत ताशी ६.४ किमीचा प्रवास करत मान्सून बीडमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने गुरुवारी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर आता येत्या काही दिवसात मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज आहे.
राज्यात मॉन्सूनच्या आगमनाची सरासरी तारीख १० जून आहे. यंदाचा मान्सून एक दिवस उशिराने दाखल झालाय. तर आता येत्या २४ तासात मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. सध्या मॉन्सूनचा दक्षिणेकडून पश्चिमेकडे प्रवास सुरू असून मॉन्सूनचा प्रवास हर्णे, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया येथेपर्यंत झाला आहे.
सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे, बारामती, सोलापूर, वर्धा, रायपूर, संबळपूर अशी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. गुरुवारी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात पूर आणला. आताही दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून नगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे.
दरम्यान देशातील इतर राज्यातही मॉन्सून आपली हजेरी लावली असून कर्नाटकचा उर्वरित भाग, संपूर्ण, रायलसीमा, आंध्रप्रदेशचा किनारी भाग, तेलगंणा, छत्तीसगडचा काही भाग, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. तर येत्या दोन तीन दिवसात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.