Categories: गुन्हे

हृदयद्रावक : दोन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या; कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

कोल्हापूर | शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे दोन मुलींसह आईने विहिरित उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुप्रिया शिवाजी भोसले (वय 24), मृणाली शिवाजी भोसले (वय 4), आणि मृण्मयी शिवाजी भोसले (वय 5) (सर्व राहणार जांभळी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे पोलिसात उघड झाली आहेत.

सोमवारी दुपारी शाळेला जाण्याचे कारण सांगून संबधित महिला दोन मुलींसह घराबाहेर पडली. मात्र सायंकाळ झाली तरी घरी न आल्याने महिलेच्या घरातील कुटुंबीय चिंतेत होते. याबाबत महिलेच्या पतीने त्वरित शिरोळ पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. मंगळवारी सकाळी महिलेच्या पतीने पै पाहुणांच्याकडे देखील चौकशी केली. अखेर ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक महिला दोन मुलींसह पिराच्या मळ्याकडे जाताना निदर्शनास आली. त्यानंतर शोध घेताना पिराच्या मळ्यातील विहीरित लहान मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. अन्य लहान मुलगी व तिच्या आईची शोध मोहीम पोलिसांच्या रेस्क्यू टीमने सुरू केली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सुप्रिया व शिवाजी यांचा पाचवर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. या घटनेमुळे गावातील वातावरण सुन्न होते. यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. दोन मुलींसह आईने केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Crime