मुंबई | महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या एमपीएससीचया पूर्व परिक्षेचे तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ही परिक्षा रविवार ११ ऑक्टोबर रोजी होणार होती. राज्य सरकारच्या या निर्णयाने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परिक्षेचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही, तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील परिक्षेची तारीख पुढे ढकलण्यास कारणीभूत ठरला आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परिक्षेस बसता येणार असून कुणीही अपात्र ठरणार नसल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
परिक्षेचा सुधारित कार्यक्रम राज्य लोकसेवा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परिक्षेसाठी देण्यात आलेले प्रवेश पत्र धारकांना सुधारित दिनांकाच्या परिक्षेस बसता येणार आहे. तसेच वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ एप्रिल २०२० हा कायम राहणार आहे.