मुंबई।अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीच्या दुसऱ्य़ा मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ही आग लेव्हल-४ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आलीय.
शॉर्ट सर्किटमुळे आज गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. मात्र, काही काळाने या आगीने रौद्ररुप धारण केले होते. दुसऱ्या मजल्यावरुन ही आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली होती. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठे लोळ हवेत उठत होते. चार तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अखेर साडे तीन वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
दुपारी एकच्या सुमारास या आगीवर नियंत्रण येईल असं वाटत होतं. मात्र, नंतर ही आग आणखी भडकली. खबरदारी म्हणून परिसरातील इतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या. परिसरातील इतर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.