Categories: Featured सामाजिक

मुंबईची लाईफलाईन रूळावर, ‘या’ लोकांना करता येणार प्रवास

मुंबई | मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल पुन्हा सुरु झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून पुन्हा प्रवास करता येणार आहे. आज (१५ जून) पहाटे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, विरार, तर मध्य रेल्वेवरील ठाणे, सीएसएमटी यासारख्या स्थानकांवरून लोकल सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर २०० तर पश्चिम रेल्वेवर १३० लोकलच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे. 

मुंबईतील लोकल सुरु करावी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईची लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असे असले तरी सध्या लोकलचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांसाठीच केला जाणार आहे. पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच यातून प्रवास करता येणार आहे. 

सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप लोकलने प्रवास करता येणार नाही. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर निवडलेल्या उपनगरी सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: mumbai railway