Categories: गुन्हे

खळबळजनक: चंदुर येथे बालिकेवर अतिप्रसंग करून विहिरीत ढकलून खून

इचलकरंजी | प्रविण पवार | इचलकरंजी शहरानजीक असणाऱ्या चंदुर येथे बालिकेवर अतिप्रसंग करून तिचा विहिरीत ढकलून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संतापाची मोठी लाट निर्माण झालीय.

घटनेची अधिक माहिती अशी, चंदुर येथील शाहूनगर परिसरामध्ये रविवारी दुपारी चार वर्षाची बालिका अंगणामध्ये खेळत असताना अचानक गायब झाली होती. तिचा शोध घेतला असता जवळच्याच शेतातील विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेह बाहेर काढून इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल मध्ये आणला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. मुलगी खेळता खेळता विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा समज होऊन नातेवाईकांनी तिचा मृतदेह दफन केला होता.

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने ही घटना अपघाती नसून खूनाची असल्याचे स्पष्ट झाले. आज सकाळी (सोमवार १५ जून) परिसरातील कारखान्यांमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजवरून सदर मुलीला एक अल्पवयीन मुलगा घेऊन जात असल्याचे दिसून आले.  त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली व उलटसुलट चर्चेस उधाण आले होते. 

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पिडितेच्या आईने तक्रार दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन अधिक चौकशी केली. यामध्ये त्याच परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी बालिकेला खाऊचे आमिष दाखवून जवळच असणाऱ्या शेतांमध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग केला व नंतर कुंभार यांच्या विहिरीमध्ये ढकलून देऊन तिचा खून केला. आरोपीनी खुनाची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली. 

शिवाजीनगर पोलिसांनी तहसिलदार यांचे उपस्थितीमध्ये मृतदेह करून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयांमध्ये पाठविला आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील करत आहेत.

Team Lokshahi News