Categories: राजकीय सामाजिक हुणार तरास, पण गुणं हमखास..

पुरोगामी पण आणि CKP पण.. ऐसा कैसे चलेगा ताई?

स्नेहल शंकर –

पुरोगामित्व हा शब्द आजकाल सहजरित्या वापरला जातो. मात्र त्या शब्दाचा अर्थ वापरकर्त्याला समजला असेलच असे नाही. किंबहुना तो समजून घेण्याची तसदी तो वापरकर्ता घेईल असेही नाही. मात्र आपण त्या ‘पुरोगामित्व परंपरेचे पाईक कसे’ हा आटापिटा सर्वार्थाने केला जातो. महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी आहे हे आपण बरेचदा ऐकतो, पण पुरोगामित्व कशाशी खातात हे आपल्याला माहित नाही. कालच सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून “My CKP Moment” अशा आशयाची पोस्ट शेअर केली. या पोस्ट मध्ये वादग्रस्त असं काही आहे किंवा नाही हे म्हणण्यापेक्षा त्या पोस्टचे चिकित्सक पध्दतीने विश्लेषण होणं अत्यंत महत्वाचे.

पुरोगामित्वाची व्याख्या करणं तितकसं सोप्पं नाही. पण पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा हे मात्र निश्चितच सांगता येईल. पुरोगामी या शब्दाबरोबर आजवर अनेक शब्द जोडले गेले जसे की पुरोगामी विचार, पुरोगामी चळवळ, पुरोगामी पक्ष, शक्ती, व्यक्ती इत्यादी. आणि महाराष्ट्राला याच पुरोगामी विचारांची माणसं, चळवळीची परंपरा लाभली आहे. पुरोगामित्वाचे उद्गाते म्हणून जनतेच्या कल्याणासाठी जात, धर्म, पंथ विरहित विचार करणारे छत्रपती शिवराय असतील  स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेचा वसा घेतलेले फुले दांपत्य, छत्रपतींचा वारसा जपणारे शाहू, उपेक्षितांसाठी अहोरात्र झटणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज हे सर्व शिलेदार या परंपरेचे पाईक आहेत. प्रचलित परंपरांविरोधात उभे ठाकत स्वतःच्या वैयक्तिक जीवनात नैतिक मुल्यांचे आचरण करीत या मंडळींनी पुरोगामी परंपरा चालु ठेवली. 

अलिकडच्या काळात राजकारणात यशवंतरावजी चव्हाणांनतर शरद पवार यांनी हा पुरोगामित्वाचा वारसा जपला. किंबहुना समांतर दिशेने पुरोगामित्वाच्या चळवळीला बळ देण्याचे काम पवारांसह अनेकांनी केले. त्यातला अलिकडचाच एक प्रसंग.. “राज्यात भीमा कोरेगावचा संघर्ष, बिघडलेलं सामाजिक राजकीय संबंध, औरंगाबादमधील जातीय संघर्ष या पार्श्वभूमीवर पुण्यातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपाप्रसंगी पवारांनी छगन भुजबळांच्या डोक्यावरील पुणेरी पगडी उतरवून फुलेंचे पागोटे डोक्यावर ठेवले. तद्नंतर राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये फुलेंचे पागोटे असावे असा जाणीवपूर्वक आग्रह पवारांनी धरला.” याला कारण म्हणजे फुलेंचे पागोटे हे ब्राम्हण ब्राम्हणेत्तर लढ्याचे प्रतिक आहे. अशा अनेक कृतितून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला ‘बुस्टर’ देण्याचे कामच पवारांनी केले आहे. 

अशा पुरोगामी नेत्याचा वारसा लाभलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी “परिवर्तनाचे शिल्पकार” हा कार्यक्रम सुरू केला. आजच्या पिढीला पुरोगामित्वाचा पुरस्कार करणाऱ्या महापुरूषांचे काम समजावे, हा या मागचा मुळ उद्देश आहे. आजच्या घडीला सुप्रियाताईंकडे देखील शरद पवारांचा पुरोगामित्वाचा वारसा जपणाऱ्या या दृष्टिकोणातून पाहिले जाते. मात्र नुकतीच त्यांनी जी “My CKP moment” ही पोस्ट शेअर केली ती वरील परंपरेला छेद देणारी वाटते. देव, कर्मकांड, जातधर्म हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असू शकतो. पण सार्वजनिक जीवनात काम करीत असताना त्या व्यक्तींनी आपले विचार वैयक्तिक ठेवण्याची खबरदारी घ्यायला हवी. 

आपण ज्या पक्षाच्या विचारधारेशी बांधिल असतो, त्या विचारांचे अनुसरण करणाऱ्यांची संख्या मोठी असते. समाजमन हे देव, कर्मकांड, जातधर्म या बाबतीत अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे पुरोगामी विचारधारेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षात असताना एका विशिष्ट जातीचे उदात्तीकरण करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसिध्द करणं अपेक्षित नाही. जात मानणं, न मानणं ही बाब खाजगी असून सार्वजनिक जीवनात परस्परभिन्न आणि परस्परविरोधी वातावरण निर्मितीस पोषक ठरते. या एका गोष्टीवरून ताईंच मुल्यांकन करणं घाईच ठरेल. पण येथे जशा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशाच सत्याला अनेक बाजू असू शकतात. मग हेही खरे आणि तेही खरे, किंवा हे ही चूक आणि ते ही चूक अशी गोलमटोल भुमिका घेणाऱ्यांच्या यादीत ताईंचा समावेश होऊ नये म्हणजे मिळवले. 

Snehal Shankar

Journalist

Share
Published by
Snehal Shankar
Tags: CKP moment mahatma phule NCP savitribai phule Sharad Pawar Supriya Sule छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रवादी शरद पवार संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज सुप्रिया सुळे