Categories: ब्लॉग राजकीय

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ परं, हत्तीला वडाळ म्हणायचं कुणी?

स्थळ : शहाणेवाडीचा पार
प्रसंग : नेहमीप्रमाणे शहाणेवाडीतील वयोवृद्ध मंडळी पारावर चकाट्या पिटायला जमा झालेली असतात. पारासमोरच्या बस पिकअपशेडच्या भिंतीवर पंचायतीचा शिपाई गणपा ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाचे पोस्टर चिटकवत असतो.

दिनाप्पा : अयं, गणपा हि आणि नवं काय आभियान म्हणायचं?
गणपा : फेसबुकवर मुख्यमंत्र्याचा हिडीओ बघिटलासा नवं? त्येच हाय त्ये,  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान… या अभियानात राज्यातल्या परतेक कुटुंबाची चौकशी आन् तपासणी व्हणार. त्यासाठी डाक्टर, नर्सा, आशासेविका, आंगणवाडीसेविका आन् गरज पडलीच तर शाळामास्तर, कालेजची पोरं बी घेणार हायत.
संभाण्णा : हात् त्येज्या आयला, बसल्या बाईला बाराबुद्ध्या फोडलं कपाळ बांधल्या चिंध्या! त्यातला परकार केला म्हणा बाळासायबाच्या पोरानं… 
किशादा : मर्दानो, इरोधी पक्षाची नेतेमंडळी त्या टिवीवरनं हटायला तयार न्हाईत. रस्त्यावर केळीच्या सालीवरनं पाय घसरुन जरी कुणी पडलं तरी त्येला राज्य सरकार जबाबदार हाय म्हणत राजभवनावर जाऊन न्याहरी करुन येत्यात. तवा लोकांस्नी समदं ठिक हाय, राज्य सरकार काम करतंय हे दाखवाय लागतं.
संभाण्णा : परं ही जनतेच्या डोळ्यात एक परकारची धुळफेक हाय किशादा, जा माहीती आशासेविकेने दर चार रोजाला दारात येऊन न्हेली त्यासाठी शेपरेट यंत्रणा लावून खर्च करायची गरजच काय? हि मजी पंत गेले आणि राव चढले, आसं झालं न्हाई का?

ख्या ख्या ख्या (पारावर हशा पिकतो)
गणपा : समदं खरं हाय आण्णा परं, हत्तीला वडाळ म्हणायचं कुणी? 
किशादा : आसं न्हाई गणपा, चुकीला चुक म्हणलं पायजेल. गेल्या पाच वर्सात राज्याच्या आरोग्य विभागात 29000 पद भरली गेल्याली न्हाईत. लॉकडाऊन करण्याचा पहिला उद्देश आरोग्य व्यवस्था सुरळीत करणे असायला पायजे हुता. तवा गृहमंत्री पुलीसांस्नी काठीला त्याल लावा म्हणून सांगत हुते. भाजीपाला, दळाण-कांडाण कराय गेल्याल्यांच्या नडग्या सुजवल्या त्यापेक्षा आरोग्य विभागाकडे लक्ष द्याला पाहीजे हुत.
गणपा : परं, किशादा आरोग्यमंत्र्यानी तर करोना काळात इशेष बाब म्हून आरोग्य विभागा आंर्तगत ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ (एनएचएम) खाली १९,७५२ पदे तातडीने मंजूर केली व्हती की!
किशादा : गणपा, घोषणा केली खरी पण, त्यापैकी १२,५७४ पदं करोनाला पाच म्हैन उलटून गेलं तरी भरली न्हाईत. 
दिनाआप्पा : हात्त तेज्यायला, मजी केंद्र सरकारनं येळेवर इमानतळ बंद केली न्हाईत, इमान परवास करुन आलेल्यांची तपासणी केली न्हाई. आन् राज्य सरकारनं आरोग्य विभागाकडं लक्ष दिल्याल न्हाई. ढवळ्या संग बांधला पवळ्या, वाण न्हाई पण गुण लागला… ही ही ही 
संभाण्णा : लगांनो, नुसता गुंधुळ चाललाय चौबाजूनं, केंद्राचा सवता, राज्याचा सवता, टिव्हीत माईकची थोटकं घेतल्यालांचा सौता आन् ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाचा सवता… काय चव राह्याली नाय गड्यांनो!
दिनाप्पा : व्हय की… जवा जनजागृती करायची गरज हुती तवा चिकन खाल्याव, टामाटू खाल्याव करोना हुतुया म्हणून टिवीवाले बोंबलत हुते. कोंबड्या पाळणारा, टामाटू पिकीवणारा शेतकरी पार बुडाला आणि आता जी काम घरोघरी जावून आशासेविका बाया करत हुत्या ते फेरशी करायचे आणि माझी जबाबदारी म्हणायचं?
किशादा : (मध्येच तोडत) व्हय दिना ह्या गोष्टी मजे बैल गेला आन् झोपा केला आस चाललंय, आरोग्यभरती हुया पाजये, परतेक सरकारी दवाखान्यात पीएचशी का काय म्हणता तिकडं पाच-पन्नास बेडची सोय पायजे, ऑक्सीजन सोय पायजे ते करायचं सूडून ह्यो पोरख्योळ करण्यात काय मजा न्हाय गड्या.
दिनाआप्पा : खरं हाय परवा चौगल्याचा हाणमाचा भाऊ गेला, करोनाचा रिपोर्ट आला न्हवता तेज्या दोनी पुतण्यानी पीपीई किट घालून दहन दिली. घरचा म्हणून जबाबदारी घिटलीच की का सरकारच्या भरवश्यावर बसलीत? आन् मंग आमांनी घरच्यांची काळजी घ्या, इंग्लीश संडासच झाकाण लावा ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यानं सांगायची गरज हाय का?
संभाण्णा : मग मोर नाचवत, माठातलं पाणी प्या, खेळणी करा सांगणारा पंतपरधान आन् हाटिलात एकमेकांच्या समूर बसू नका सांगणारा मुख्यमंत्री ह्यात फरक काय? ख्या ख्या ख्या
गणपा : बरं रिटायर मंडळी तुमचं चालू द्या मी चलतू. तुमच्याबरं बाण्या हाणताना कुणी ऐकलं तर… मी बी रिटायर व्हायचा पंचायतीतनं… ही ही ही
दिनाप्पा : संभाण्णा, किशादा आपुणबी घराकडं जाऊया… आभियानाची मानसं घराकडं यीवून काय तपासणी करत्यात, माहिती घेत्यात ती देऊया त्या निमतान 5-10 किलू गहू तांदूळ आगाव मिळालं तर मिळालं कस्सं ऑ… 
ख्या ख्या ख्या पारावर एकच हशा पिकतो, सगळी मंडळी आपापल्या घराकडं ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाची माहीती देण्यासाठी जातात.

– तुषार गायकवाड (लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

Tushar Gaikwad