Categories: Featured प्रशासकीय राजकीय

महापालिकेची सभा घेण्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी आमनेसामने

नागपूर | महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे पहायला मिळत आहे. आताचा वाद हा महापालिकेची सभा घेण्यावरून सुरू झालाय. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांना पत्र लिहून २० तारखेची महापालिकेची सभा रद्द करण्यासं सांगितलं आहे. त्यासाठी तुकाराम मुंढेंनी कोरोनाचं कारण दाखवून, नगरसेवकांमुळे कोरोनाचा प्रसार होईल म्हणून सभा रद्द करा, असं नमूद केलं आहे. मात्र महापालिकेची सभा घेण्यावर महापौर ठाम असून त्यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंची विनंती फेटाळून लावली आहे. सर्व पक्षांशी चर्चा करुनच सभा घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतल्याचे म्हणटले आहे.

महापौर आणि आयुक्तांमधील वाद
महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद काही नवा नाही. भाजपची सत्ता असलेल्या या महापालिकेत यापूर्वी अनेक विषयांवरुन दोघांमध्ये खटके उडाले आहेत. नागपुरात ‘कोरोन’बधित रुग्णांचा आकडा वाढत असताना, यासाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला होता. या आरोपावर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आपण सगळं काम नियमाला धरून करत आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं आहे, असे तुकाराम मुंढे म्हणाले होते.

तुकाराम मुंढे यांनी २७ जानेवारीला नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून महापौर विरुद्ध आयुक्त हा वाद सुरू झालाय. सत्ताधारी आणि महापालिका आयुक्तांमध्ये संघर्ष व्हावा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुद्दाम तुकाराम मुंढे यांची नागपुरात बदली केली असावी, असं मत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं.

Team Lokshahi News