Categories: प्रशासकीय

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली..!

मुंबई | नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून मुंढे यांची बदली झाली. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले होते.

कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. जानेवारी महिन्यातच नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात त्यांची पुन्हा एकदा बदली झाल्याने चर्चांना ऊत आला आहे. 

नागपूरवासियांसाठी कोरोना विरोधात लढता लढता सध्या तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंढे यांची आजवरची कारकिर्द वादळी ठरली असून ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली आहे, त्याठिकाणी त्यांनी आपल्या कठोर आणि शिस्तप्रिय  भूमिकेमुळे अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. नागपूर येथून झालेली बदली देखील नेमकी कोणत्या कारणाने झालीय हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या बदलीमागेही असेच राजकारण असण्याची शक्यता नागपूर मध्ये सुरू आहे.

Team Lokshahi News