Categories: राजकीय

नरेंद्र मोदीनी राजीव गांधींना ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणणे हा मोदींच्या विकास पुरूष प्रतिमेचा पराभव

फेसबुक(६ मे): नरेंद्र मोदींनी राजीव गांधींना ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणून संबोधणं हे पूर्णतः चुकीचे आहे. त्याचबरोबर राजीव गांधींच्या ‘मिस्टर क्लीन’ या प्रतिमेचा विचार केला तर ती प्रतिमा तितकीच खरी आहे जितकी, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा गुजरातमध्ये ‘विकास पुरूष’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे जर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विकास पुरुष अशी नसेल तरच राजीव गांधींना ‘मिस्टर क्लीन’ न म्हणायला हरकत नाही.

ज्या बोफोर्स घोटाळ्याचा आरोप राजीव गांधींवर केला गेला, त्याच्या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न झालंय हे पाहीले तर आपल्या लक्षात येईल, 64 कोटी रुपयांच्या या तथाकथित लाचखोरी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही राजीव गांधींवर कोणताही आरोप सिद्ध होऊ शकला नव्हता. न्यायालयाने राजीव गांधीना निर्दोष सांगितले.

20 मे 1991 ला जेव्हा राजीव गांधींचा मृत्यू झाला होता, तेव्हा त्यांच्यावर बोफोर्स घोटाळ्याचा आरोप करणारे भाजपेयीच सत्तेमध्ये होते. त्यावेळेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. जर राजीव गांधींचा मृत्यू झाला नसता तर ते निःसंशय पुन्हा एकदा पंतप्रधान बनले असते.

राजीव यांच्या मृत्यूनंतर व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाच्या तीन वर्षांच्या आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींच्या भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या शासन काळात बोफोर्स प्रकरणात काहीही सिद्ध झालं नाही. त्यामुळं बोफोर्सच्या आधारे राजीव गांधींना ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणता येणार नाही. पंतप्रधानांनी असे म्हणणे म्हणजे त्यांच्यावरील त्यांच्या मातृसंस्थेचे खरे संस्कार भारतीय जनतेसमोर मांडण्यासारखे आहे.
विशेष म्हणजे वाजपेयी सरकारच्या काळातच राजीव गांधींचं नाव बोफोर्सच्या आरोपपत्रांतून हटवण्यात आलं होतं.

राजकारणात एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणात याच दृष्टिकोनाची किंमत मोजावी लागली. जनतेनं त्यांना निवडणुकीत पराभूत केलं. त्यांच्या प्रतिमेवर बराच काळ बोफोर्स प्रकरणाचं सावट पडलेलं होतं.

नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा दुसरा भाग हा अधिक निराशाजनक आहे. राजीव गांधींच्या मृत्यूचा संबंध मोदींनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांशी जोडण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधींची हत्या जगातील सर्वांत भयंकर अशा कट्टरपंथी हल्ल्यामध्ये करण्यात आली होती. पहिल्यांदा इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधींनी कट्टरपंथी हल्ल्यामध्ये प्राण गमावले होते.

श्रीलंकेमध्ये शांती सेना पाठविण्याच्या निर्णयानंतर लिट्टे (LTTE) ने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये राजीव गांधींचा मृत्यू झाला होता. राजीव गांधींनी जर त्यावेळेस श्रीलंकेत शांती सेना पाठवली नसती, तर पाकिस्तानसोबतच श्रीलंकाही अमेरिकेचं एक सामरिक केंद्र बनला असता. आणि आज नरेंद्र मोदींना प्रचारासाठी पाकिस्तान प्रमाणे आणखी एक मुद्दा मिळाला असता.

लेखन : मेधा आगवेकर

By Lokshahi.News

Lokshahi News